Ad will apear here
Next
महाभारताचा उपसंहार (उत्तरार्ध)


महाभारताचा सर्वांगीण परामर्श घेणारा विवेचक उपसंहार रा. ब. चिंतामणराव विनायक वैद्य यांनी संशोधनातून सिद्ध केला. त्या ग्रंथाची ओळख करून देणारा, ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांच्या लेखाचा उत्तरार्ध.. त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
...............
लेखाच्या पूर्वार्धात आपण रा. ब. चिंतामणराव विनायक वैद्य यांच्याबद्दल, तसेच उपसंहार या ग्रंथाच्या पहिल्या दोन प्रकरणांबद्दल माहिती घेतली. आता पुढील प्रकरणांची माहिती घेऊ या.

प्रकरण तिसरे : भारतीय युद्ध काल्पनिक आहे की काय? (पृष्ठे ११)
भारतीय युद्धानंतरच मूळ ‘महाभारत’ ग्रंथ निर्माण झाला. ‘हे युद्ध काल्पनिक असून, सद्गुण आणि दुर्गुण यांचा उत्कर्ष-अपकर्ष दाखवणारी काल्पनिक पात्रे त्यात दाखवली आहेत,’ अशी अनेकांची कल्पना होती. तो इतिहासच आहे, हे उत्खनानादि अनेक पुराव्यांच्या आधारे आता सिद्ध झाले आहे. या प्रकरणात त्याविषयी अनेक उदाहरणे दिलेली आहेत. सिंधू, सरस्वती, यमुना, गंगा आणि सरस्वती या नद्यांचा मिळून त्या काळातला भारत देश (भरतखंड) होता. त्या वेळी मोठमोठी राज्ये नव्हती. कौरव आणि पांडवांना त्यांच्या त्यांच्या मित्र राज्यांनी युद्धात साथ दिली. त्या राज्यांची नावे महाभारतात दिलेली आहेत.

प्रकरण चौथे : भारतीय युद्धाचा काळ (पृष्ठे ८०)
कौरव-पांडव युद्धाला प्राचीन इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. ते नक्की कधी झाले, याबद्दल मतमतांतरे आहेत. परंतु ते झाले यावर आता जवळजवळ एकमत आहे. वैद्यांना इ. स. पू. ३१०१ हा कलियुगाचा प्रारंभ योग्य वाटतो. त्यापूर्वी युद्ध झाले. तोच श्रीकृष्णाचाही काळ आहे. युधिष्ठिर हा कलियुगातील पहिला राजा होय. सम्राट चंद्रगुप्ताचा काळ इ. स. पूर्व ३१२ निश्चित केलेला आहे. तोपर्यंतची वंशावळ अनेक पुराणांमधून दिली आहे. त्याचा परामर्श ‘उपसंहारा’त घेतलेला आहे. भारतामधील आणि परदेशी इतिहासकार व ज्योतिषी यांनी लिहून ठेवलेल्या पुराव्यांचा काटेकोर अभ्यास इथे झाला आहे. ग्रह-नक्षत्र-ग्रहण स्थितींचा सूक्ष्म विचार केलेला आहे.

प्रकरण पाचवे : इतिहास कोणत्या लोकांचा? (पृष्ठे ४६)
रामायणातील राजे सूर्यवंशी आणि महाभारतामधील राजे चांद्रवंशीय होते. मनूच्या वंशात भरत नावाचा राजा झाला. त्याच्यावरूनच ‘भारतवर्ष’ असे नाव पडले. तो सूर्यवंशी होता. दुष्यंत-शकुंतलेचा पुत्र भरत हा वेगळा होय. तोच कौरव-पांडवांचा पूर्वज. चंद्रवंशाचा मूळ पुरुष पुरुरवा. ययाती आणि त्यांचे पुरू, यदू, आदि पाच पुत्र चंद्रवंशातीलच. श्रीकृष्ण यदुकुळातील यादव. कुरुकुळातील राजा प्रतीप, त्याचा मुलगा शंतनू, त्याचे दोन पुत्र - भीष्म व विचित्रवीर्य, भीष्मांनी राज्यावरचा हक्क सोडल्यामुळे विचित्रवीर्य राजा झाला. त्याचे पुत्र धृतराष्ट्र व पंडू. धृतराष्ट्र अंध असल्यामुळे पंडूला राज्य मिळाले. पुढे तो वनात गेला. देवतांच्या आशीर्वादाने दोन राण्यांकडून (कुंती आणि माद्री) त्याला पाच पुत्र झाले - तेच पांडव. दरम्यान धृतराष्ट्रपुत्र दुर्योधन राज्य करत होता. शंभर बंधूंसह तो कौरवकुळातला. राज्यवाटपावरून कौरव-पांडवांत संघर्ष झाला आणि त्यातूनच भारतीय युद्ध घडले. कौरवांकडे ११ आणि पांडवांकडे सात अक्षौहिणी सैन्य होते. कोणकोणते देश दोन्ही बाजूंनी लढले, याचा तपशील ग्रंथात दिला आहे. आर्य बाहेरून आले की इथलेच, याचाही विचार केला आहे. बृहत्तर भारताचा विस्तार खूप मोठा होता. भारतीय आर्यांचे शारीरिक प्रमाण दिलेले आहे. हिंदुस्तानातील लोक १४० वर्षांपर्यंत जगतात, असे ग्रीक इतिहासकाराने लिहून ठेवले आहे. भारत युद्धसमयी सर्वांचे वय ७५-८०च्या पुढे होते. श्रीकृष्ण ११० ते १२० वर्षांचा असताना निजधामाला गेला, तेव्हा वासुदेव (वडील) जिवंत होते, म्हणजे १४०च्या पुढे! याचा अर्थ दीर्घायुषी जीवन होते.

प्रकरण सहावे : वर्णव्यवस्था, आश्रमव्यवस्था व शिक्षण (पृष्ठे ७७)
वर्णव्यवस्था भारतामध्येच अस्तित्वात आली. जगात अन्यत्र कुठेही नाही. त्या व्यवस्थेचे खरे स्वरूप पाश्चात्यांच्या लक्षात येत नाही. त्यासाठी प्राचीन ग्रंथांचा अभ्यास आवश्यक आहे. भारतकाळी चार मुख्य वर्णांशिवाय अनेक वर्ण व जाती उत्पन्न झाल्या होत्या. वर्ण फार जुन्या काळापासून प्रचलित होते. धंद्यांच्या भेदामुळे जाती निर्माण झाल्या. कर्माच्या अनुरोधाने निरनिराळ्या वर्णांचे स्वरूप प्राप्त झाले. प्रत्येक वर्णाला कर्माचे (धंद्यांचे) निर्बंध होते. वर्णसंकरामुळे निर्माण झालेल्या जातींचेसुद्धा ठरलेले धंदे होते. तीच गोष्ट गोत्रांची. सुरुवातीला चारच गोत्रे होती. अंगिरस, कश्यप, वसिष्ठ आणि भृगू. पुढे प्रवर्तकांच्या कर्मभेदाने अनेक गोत्रे निर्माण झाली. आश्रमव्यवस्था हेदेखील इथले महत्त्वाचे अंग आहे. वर्णव्यवस्था हळूहळू विकसित झाली आणि आज तिला अभेद्य आणि प्रचंड (गंभीर) स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याउलट आश्रमव्यवस्था पूर्वी उत्तम स्थितीत होती, तर हल्ली ती जवळजवळ नष्टप्राय झालेली आहे. चार आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. या प्रकरणात शिक्षणपद्धतीची माहितीही दिलेली आहे. गुरुगृही जाऊन शिक्षण घेण्याची (गुरुकुल) पद्धत त्या काळी होती. धंदेशिक्षणही परंपरेने पुढे चालू राहत असे. स्त्रियांसाठी स्वतंत्र शाळा नव्हत्या. लिहिणे, वाचणे, धर्म आणि क्षत्रिय स्त्रियांना ललित कलांचे शिक्षण देत असत.

प्रकरण सातवे : विवाहसंस्था (पृष्ठे ४६)
हे समाज-परिस्थितीचे एक महत्त्वाचे अंग आहे. प्राचीन काळी विवाहाचे निर्बंध (नियम) नव्हते. भारतातच विवाहाला उदात्त आणि पवित्र स्वरूप प्राप्त झालेले आहे. जुन्या कालखंडात पुत्रप्राप्तीसाठी नवऱ्याच्या परवानगीने स्त्रीने अन्य पुरुषाशी संग करावा, अशी नियोगाची चाल कित्येक समाजात चालू होती. पुढे ती प्रथा बंद पडली आणि पातिव्रत्याची कल्पना उच्चस्थितीला जाऊन पोचली. पुनर्विवाहास बंदी होती. अनेक पत्नीविवाह प्रचलित होते. एका स्त्रीने अनेक पती करण्याची प्रथा हिमालयातून नव्याने आलेल्या चंद्रवंशी लोकांत सुरू होती. विवाहाचे ब्राह्म, क्षात्र, गांधर्व, आसुर, राक्षस आदि आठ मुख्य प्रकार अस्तित्वात होते. विवाहासंबंधी काही अटी/निर्बंधही प्रचलित होते. सतीची चाल प्राचीन काळापासून महाभारत काळापर्यंत अस्तित्वात होती. एवढेच काय, ब्रिटिशांनी आणि भारतीय समाजसुधारकांनी त्याला प्रचंड विरोध करून, कायद्याने गुन्हा ठरवल्यानंतरच ती अनिष्ट प्रथा बंद पडली. क्षत्रिय राजेलोकांत पडद्याची चाल सुरू होती, हे ग्रंथांमधील वर्णनांमधून दिसते. सगोत्र विवाहास निर्बंध होता. तसेच आणखी काही नियमही होते.

प्रकरण आठवे : सामाजिक परिस्थिती (पृष्ठे ७९)
अन्न, वस्त्रभूषणे आणि चालीरीतींसंबंधी असलेल्या प्रचलित परिस्थितीविषयी वर्णन या प्रकरणात आहे. मांससेवन आणि मद्यपानावर नियंत्रण होते. गोहत्या महापाप मानले जाई. जेवणात तांदूळ, गहू, सत्तू (सातू) ही धान्ये होती. त्या काळी गायींची समृद्धी होती. त्यामुळे दूध-तुपाचा वापर भरपूर असे. जेवताना मौन पाळावे असा नियम होता. कोठे जेवू नये याचे निर्बंध होते. पुरुषांची वस्त्रे साधी असत. एक कमरेचे धोतर आणि एक वर अंगावर घेतलेले. विजारी, बंडी अंगरखे इत्यादी त्या काळात माहीत नव्हते. स्त्रिया लांब वस्त्र नेसून तेच खांद्यावरून घेत असत. त्याशिवाय डोक्यावरून घेण्याचे उत्तरीय वस्त्र असे. स्त्रिया वेणी घालत आणि पुरुष पागोटे वापरत. कापूस, रेशीम आणि लोकरीची वस्त्रे बनत. अरण्यात राहणारे मुनी व त्यांच्या स्त्रिया झाडाच्या सालीपासून बनवलेली वल्कले वापरत. पादत्राणे लाकडी, चामडी किंवा गवतापासून बनवलेली असत. पुरुष डोक्याला शिखा (शेंडी) ठेवत.

स्त्रिया आणि पुरुषांनाही अलंकारांची खूप आवड असे. मोती, सोने आणि रत्नांची त्या काळी समृद्धी होती. चांदीही वापरात होती. गायी, घोडे, हत्तींनाही अलंकारांनी सजवण्यात येई. राजे लोक डोक्यावर रत्नजडित सोन्याचे मुकुट घालत. स्त्रिया सर्व अंगभर अनेक प्रकारचे अलंकार घालत. बसण्यासाठी चौरंगासारखी आसने असत. त्यावर सुवर्ण व हस्तिदंती नक्षीकाम केलेले असे. गाद्यागिरद्याही असत. सिंहासने उंच व रुंद असत. द्यूत (जुगार) खेळण्याचे व्यसन अस्तित्वात होते; परंतु एकूण आचरण शुद्ध असे. सत्यवादित्व आणि वडीलधाऱ्याचा मान राखण्याची पद्धत होती. उद्योगशीलता होती. चोऱ्या अत्यल्प आणि त्याही अगदी किरकोळ रकमेच्या असत. देहत्याग हा रणात किंवा वनात (वानप्रस्थ) व्हावा अशी लोकांची धारणा असे. अंत्यविधीची विशिष्ट पद्धत नव्हती. गिधाडे किंवा हिंस्र प्राणी प्रेतांचा ‘आस्वाद’ घेत. स्मारके उभारण्याचीही पद्धत नव्हती.

हत्ती हे राजे आणि श्रीमंत लोकांचे आवडते वाहन होते. त्याखालोखाल चार घोडे जोडलेले रथ. उंटही वापरात होते. गाढव, खेचरांचेही रथ होते. सामानाच्या गाड्या ओढण्यासाठी बैलांचा वापर होई. गाणे आणि नृत्य यांचा लोकांना शौक होता. वीणा हे मुख्य वाद्य होते. आर्यांना बागा लावण्याची आवड होती. लोक तिथे फिरायला जात असत. पर्वतांवर उत्सव साजरे होत असत. लोक दान, अध्ययन, होम-हवन आणि देव-अतिथी-पितरांचे पूजन करीत. तप-उपवासाकडे प्रवृत्ती असे. दीन, वृद्ध, दुर्बल, रोगी यांच्यावर दया करत. वाडवडिलांची सेवा हा धर्म होता. पुढे पुढे असे उत्तम आचरण कमी कमी होत दुराचार सुरू झाला. लोक नास्तिक, कृतघ्न, अमर्यादशील आणि निस्तेज होऊन गेले.

प्रकरण नववे : राजकीय परिस्थिती (पृष्ठे ८१)
भारतात महाभारतापूर्वी शेकडो लहानमोठी राज्ये होती. तेथील राजकीय व्यवस्था राजेलोकच बघत. आक्रमण करून राज्यविस्ताराची कल्पना नंतर उदयास आली. समाज, राज्ये जिंकलीच, तरी ती नष्ट करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. राजसत्ता स्वायत्त आणि अनियंत्रित होती. ब्रह्मदेवाने (ईश्वराने) निर्माण केलेले कायदे राजाने पाळावेत, असा संकेत होता. श्रुतिस्मृती किंवा दंडनीती शास्त्रांत त्या आज्ञा नमूद केलेल्या आहेत. जो राजा धर्मशास्त्राप्रमाणे वागणार नाही, त्याला काढून टाकण्याचा अधिकार ऋषींना होता. अर्थात राजाला देवाचा अवतार मानत असत आणि तोही त्याला अनुसरून कारभार करी. प्रजापालन आणि न्याय देणे हे त्याचे कर्तव्य असे. शिक्षा देण्याचा अधिकार त्याला होता. दंडनीती त्या काळी ग्रंथांमधून विशद केलेली होती. ‘कौटिल्याचे अर्थशास्त्र’ अशा महत्त्वाच्या अनेक विषयांचा ऊहापोह करते. तो ग्रंथ प्राचीन ग्रंथांवरूनच संपादित करण्यात आलेला आहे. राजदरबार, अधिकाऱ्यांची निवड, राजाची दिनचर्या यांबद्दल ‘उपसंहारा’त चांगला प्रकाश टाकला आहे. करांची व्यवस्थाही दिली आहे. त्या काळी ‘निष्क’ नावाचे सोन्याचे नाणे वापरात होते. परराज्यसंबंध चांगले असत. एकमेकांत भांडणे आणि लढाया होत. परंतु स्वातंत्र्याबद्दल जागृत अभिमान असे. शत्रूच्या पाडावासाठी साम, दाम, दंड, भेद, मंत्र, औषधी आणि इंद्रजाल हे सात उपाय केले जात. शत्रू जर कपटाचे आचरण करत असेल. तरच आपणही तसेच आचरण करावे, अशी कुटिल राजनीती होती. राजाचे कर्तव्य म्हणजे पराक्रम, धैर्य, निश्चय, हीन वा परतंत्र न होण्याची मनोवृत्ती आणि उद्योग यांच्यावर भर देणे. दैन्यावस्था प्राप्त झालेल्या कुटुंबासही तोच मार्मिक उपदेश लागू आहे.

प्रकरण दहावे : सैन्य व युद्ध (पृष्ठे ३६)
त्या काळी सैन्याची व्यवस्था खूप उत्कर्ष पावलेली होती. युद्धाचे प्रकार (व्यूह) सुधारलेले होते; मात्र धर्मयुद्धावर राष्ट्रांचा भर होता. सेनेचे चार मुख्य विभाग होते. पदाति (पायदळ), अश्व, गज आणि रथ हेच चतुरंग दल. फौजेला वेळेवर पगार मिळण्याची व्यवस्था होती. तो धान्यरूपाने आणि काही नकद असे. वाहतूक, नौका, हेर आणि देशिक अशी सैन्याची आणखी चार दले असत. धनुष्यबाण हे मुख्य शस्त्र होते. वेगाने हालचालींसाठी रथ हे वाहन होते. ते चालवणारे तज्ज्ञ म्हणजे रथी. धनुष्याला बाण जोडून, काही मंत्रांचा उच्चार करून ते सोडले जात तीच अस्त्रे - अग्निअस्त्र, वायुअस्त्र, पर्जन्यास्त्र, वैष्णवास्त्र, इत्यादी. अस्त्रांच्या योजनेत चार भाग होते, ते म्हणजे मंत्र, उपचार, प्रयोग व संहार. अस्त्रविद्या ही दैवी विद्या होती. रथांचे सविस्तर वर्णन ग्रंथात दिले आहे. रथी लोक द्वंद्वयुद्धेही करत. धर्मयुद्धाचे नियम काटेकोरपणे पाळले जात. बाणाच्या टोकांना विष लावू नये; रथीने रथीशी, हत्तीने हत्तीवर बसलेल्याशी आणि घोड्यांवरून घोडेस्वारांशीच लढावे; भयभीत किंवा पलायन करणाऱ्यावर शस्त्र टाकू नये, सूर्यास्तानंतर युद्ध थांबवावे, अशा प्रकारचे नियम होते. कूटयुद्धही होत असे. विमानांचाही उल्लेख महाभारतात आहे. सैन्यांची मांडणी (व्यूह) अनेक प्रकारची असे. त्यात रोज बदल केला जाई. अभिमन्यूचा मृत्यू चक्रव्यूहात झाला. सैन्याबरोबर बाजारबुणगे असायचे. सामानाचे खटारे, व्यापारी, वेश्या, त्यांची वाहने, हत्ती, घोडे, स्त्रिया, पंगू, त्याशिवाय द्रव्यकोश आणि धान्यकोश इत्यादी हत्तींवर लादून युद्धाची स्वारी चाले.

प्रकरण अकरावे : व्यवहार व उद्योगधंदे (पृष्ठे २४)
त्या काळी भारतामधील सर्व राज्यांमधील व्यापार आणि उद्योगाच्या वृद्धीकडे सरकारचे पूर्ण लक्ष होते. शेती, गोपालन आणि व्यापार हे मुख्य तीन धंदे होते. शेतीसाठी योग्य पाणीपुरवठा केला जाई, तलाव बांधले जात. आंबा, ऊस, नीळ व अन्य वनस्पतींचे उत्पादन होत असे. सरकार आणि सावकार कर्जपुरवठा करत. त्यावर व्याजाचा दर दरसाल शेकडा फक्त एक टक्का असे. मेंढ्या-बकऱ्या पाळल्या जात. हत्ती आणि घोड्यांचे शास्त्र लोक चांगले जाणत होते. कापूस, रेशीम आणि लोकरीचे कापड बनत असे. तलम कापड, ग्रीस, रोम, पार्शिया येथे निर्यात होई. त्यासाठी भडोच आणि दक्षिणेकडे बंदरे होती. कारागीरांना प्रोत्साहनार्थ द्रव्य आणि उत्पादनाची उपकरणे दिली जात. वनस्पतींपासून रंग बनवण्याची कला पूर्णतेला पोहोचली होती. बहुतेक सर्व धातूंची माहिती होती. सोन्याचे उत्पादन भरपूर होते. मोती आणि मौल्यवान रत्नांचा व्यापार जोरात होता. हस्तिदंताच्या वस्तू तर होत्याच.

वास्तुकलेचा विचार करता, घरे आणि मंदिरे, लाकूड आणि मातीपासून बनवली जात. दगडी काम कमी होते. हिंदुस्तानात दास किंवा गुलाम त्या काळी नव्हते. वैदिक काळात युद्धात जिंकलेला लोकांना दास म्हणत. पुढे ती प्रथा बंद झाली. वजनमापे कशी होती? धान्याचे मूळ माप मुष्टी किंवा प्रस्थ. २५६ मुष्टी म्हणजे एक पूर्णपात्र. त्यापेक्षा मोठे माप म्हणजे द्रोण. सोने, चांदीच्या वजनांसाठी सूक्ष्म मापेसुद्धा असलीच पाहिजेत. लांबी मोजण्यासाठी किष्क, धनुष्य, योजन ही परिमाणे होती.

प्रकरण बारावे : भौगोलिक माहिती (पृष्ठे ५३)
हे प्रकरण महत्त्वाचे आहे. देशाच्या दृष्टीने त्याचा भूगोल हा अभ्यासाचा विषय असतो. जुन्या काळी पृथ्वीची सात द्वीपे मानली जात. त्यातील जंबुद्वीप किंवा सुदर्शन द्वीपात भारतवर्ष येते. ते चक्राकार असून, चहूबाजूंनी लवण समुद्राने वेढलेले आहे. चारी दिशांना असलेल्या नद्या-पर्वतांची माहिती ग्रंथात दिलेली आहे. जंबुद्वीपात सात खंडे येतात. भारतवर्ष, हैमवत वर्ष आणि हरिवर्ष ही त्यातील तीन. हैमवतात (इलावर्ष) चीन, तिबेट, तुर्कस्तान, इराण, ग्रीस, इटली हे देश येतात. त्या देशांची माहिती महाभारतकाळी चांगली होती. यवन म्हणजे ग्रीक, कांबोजी (अफगाण), पुलत्थ, हूण, पारसीक हे लोकही ज्ञात होते. सात कुलपर्वत म्हणजे पर्वतांच्या रांगा होत्या, त्या अशा - १) महेंद्र (पूर्वेला) २) मलय (पूर्व-पश्चिम घाट जोडणारा), ३) सह्यपर्वत (महाराष्ट्र), ४) शुक्तिमान (काठेवाड-गिरनार) ५) ऋक्षवान (अरवली, राजपुताना) ६) विंध्य (बडोद्यापासून पूर्व-पश्चिम), ७) पारियात्र (विंध्याचाच भाग अथवा सिंधुनदीच्या पलीकडे). समुद्रही सात होते. लवण, क्षीर, दधी, पीत, तांबडा, पांढरा, काळा. (साता समुद्रापलीकडे, असे आजही म्हणण्याची पद्धत आहे.)

भारतात म्लेंच्छ, आर्य आणि उभयतांच्या मिश्रणाने निर्माण झालेल्या जाती, असे तीन प्रकारचे लोक राहत. भरतखंडात १५६ देश सांगितले आहेत. दक्षिणेकडे ५० आणि उत्तरेकडे २६ म्लेंच्छ देश होते. चारी दिशांकडील सर्व देशांची माहिती ग्रंथात दिली आहे. त्या वेळच्या नद्या : गंगा, यमुना, सरस्वती, शुतुद्री, परुष्णी, असिन्की, वितस्ता, मरुतवृधा, सिंधू, कुमा (काबुल), गोमती, सुवस्तू, गंडकी, महाशोण, सदानीस, शरयू, लौहित्या (ब्रह्मपुत्रा), फल्गू, नर्मदा, पयोष्णी (तापी), कावेरी, ताम्रपणी, इत्यादी. तीर्थस्थळेही भरपूर होती, ती ग्रंथात पाहावीत. पुष्कर (राजस्थान) आणि कुरुक्षेत्र (सध्याचे हरियाणा) या क्षेत्रांना खूपच महत्त्व होते. पांडवांनी संपूर्ण भारतामध्ये तीर्थयात्रा केली होती. 

आता शहरे बघू - हस्तिनापूर (कौरवांची राजधानी), इंद्रप्रस्थ (पांडवांची राजधानी), वारणावत, माकंदी, विराट, उपप्लव्य, मथुरा, अहिच्छत्र, कान्यकुब्ज, शक्तिमती, कुशाम्ब (कौशांबी), प्रयाग, अयोध्या, मिथिला, चंपा, काशी, राजगृह (बिहार), गया, एकचक्रा, शाकला, तक्षशिला, द्वारका, भरुकच्छ, शूर्पारक (सोपारा), कौडिण्यपूर (विदर्भ) इत्यादी इत्यादी.

प्रकरण तेरावे : ज्योतिर्विषयक ज्ञान (पृष्ठे ३०)
महाभारतात ज्योतिर्विषयक उल्लेख अनेक ठिकाणी आहेत. सूर्य-चंद्राचे गणित लोकांना ठाऊक होते. २७ नक्षत्रांची माहिती होती. एखादी गोष्ट अमुक नक्षत्रावर झाली, असे सांगण्याची पद्धत होती. त्या काळी कृत्तिकेपासून नक्षत्रांचा प्रारंभ होत असे (अश्विनी नव्हे). उत्तराषाढा आणि श्रवण यांच्यामध्ये अभिजित हे (२८वे) नक्षत्र होते. ते पडल्यामुळे २७ नक्षत्रेच गणली जातात. पाच वर्षांचे युग धरले जाई. कालाचे विभाग पुढीलप्रमाणे होते.

१५ निमिष = १ काष्ठा
३० काष्ठा = १ कला
३० कला = १ मुहूर्त
३० मुहूर्त = १ दिवस
३० दिवस = १ महिना
१२ महिने = १ वर्ष
५ वर्षे = १ युग

तिथीही अस्तित्वात होत्या. पंचमी, दशमी, पौर्णिमा शुभ मानल्या जात. महिने मार्गशीर्षापासून सुरू होत आणि ते पौणिमान्त असत. ऋतू सहाच होते. दक्षिणायन व उत्तरायण ठाऊक होते. दर पाच वर्षांत दोन अधिक महिने घातले जात. वेदांग ज्योतिष प्रचलित होते. कृत, त्रेता, द्वापार व कली ही चार युगे चालत आली होती. चार युगे मिळून ४३ लाख ३२ हजार वर्षे होतात. सात ग्रह आणि त्यांच्या भ्रमणाचे ज्ञान होते. राहू, केतूसुद्धा ग्रह म्हणून धरले जात. यज्ञ करण्यासाठी हे खगोलाचे ज्ञान आवश्यक असे. ज्योतिष अथवा जातक हा स्वतंत्र विषय होता.

प्रकरण चौदावे : वाङ्मयशास्त्रे (पृष्ठे २४)
आर्य महाभारत काळात भारतीय संस्कृत बोलत होते. प्राकृत भाषा अस्तित्वात नव्हती. वैदिक वाङ्मय तयार झालेले होते. चार वेदसंहिता, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक, उपनिषदे, षडंगे म्हणजे छंद, तिरुक्त, शिक्षा, कल्प, व्याकरण आणि ज्योतिष यांचा अभ्यास त्या काळी होत होता. लगधाचे वेदांग ज्योतिष प्रसिद्ध होते. इतिहास व १८ पुराणेही उपनिषत्काली होती. गौतमाचे न्यायशास्त्र प्रचलित होते. धर्मशास्त्र, कामशास्त्र, अर्थशास्त्र आणि मोक्षशास्त्र ही चार शास्त्रेसुद्धा असली पाहिजेत. मोक्षशास्त्रात सांख्य, योग व वेदान्त हे येतात. बृहस्पतीचे नीतिशास्त्र होते. त्याशिवाय, तत्त्वज्ञान, भाषाशास्त्र, गायन, गणित, शिल्पशास्त्र ही परिपक्व स्थितीत होती. काव्य व नाटकही होते.

प्रकरण पंधरावे : धर्म (पृष्ठे ४७)
ईशस्तुती अथवा स्वाध्याय आणि यज्ञ ही वैदिक धर्माची मुख्य अंगे होती. इंद्र, सूर्य, विष्णू व वरुण या मुख्य देवता होत्या. घरी रोज संध्या होत असे, तसेच होमहवनही. देवांच्या मूर्ती मात्र नव्हत्या. मंत्र आणि सूक्तांच्या द्वारे पूजा होत असे. देवता ३३ होत्या - ११ रुद्र, १२ आदित्य आणि दोन अश्विन. शिव आणि विष्णूचे माहात्म्य हळूहळू वाढत गेले. त्रिमूर्ती अर्थात दत्तात्रेयांचा उल्लेख वनपर्व आणि शांतिपर्वात येतो. स्कंद (शिवपुत्र), दुर्गा यांची भक्ती केली जाई. पितरांची पूजा म्हणजे श्राद्ध करण्याची प्रथा होती. शास्त्रानुसार रोज काही तरी दान करावे असा नियम होता. अन्नदान, गोदान, सुवर्णदान आपापल्या ऐपतीप्रमाणे करीत. उपवास श्रेष्ठ मानला जाई. जप करणे महाफलदायी सांगितले होते. हिंसा हे पापच, असे मत त्या वेळी होते; परंतु यज्ञांत हिंसा होत असे. वर्णाश्रम आणि अतिथीधर्माबद्दल पूर्वी लिहिलेच आहे. स्वर्ग-नरककल्पना अस्तित्वात होती. अतल, वितल, सुतलादि आठ आणि ब्रह्म व विष्णुलोक कल्पिलेले होते. अज्ञानाने अथवा ज्ञानपूर्वक केलेल्या पापांना प्रायश्चित्ते सांगितलेली होती. संस्कार सोळा प्रकारचे नव्हते; पण जातकर्म, उपनयन, चौल, विवाह, और्ध्वदेहिक इत्यादींचे आचरण होत असे.

प्रकरण सोळावे : तत्त्वज्ञान (पृष्ठे ६९)
वेदान्त हे भारतीयांचे श्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे. भगवद्गीतासुद्धा उपनिषदासमान मानली जाते. (गीतेमधील काही श्लोक उपनिषदांमधूनच घेतलेले आहेत.) मोक्षविषयक ज्ञान देणारे अनेक संवाद महाभारतात आहेत. वेदान्त, कपिलाचे सांख्य अणि चार्वाकाचे वेदबाह्य विचार ही तीन प्रमुख तत्त्वज्ञाने होत. भारतीयांचे वैशिष्ट्य म्हणजे चार्वाकाच्या नास्तिक मताचाही आदर केला गेला. पृथ्वी, आपादि पाच महाभूते आणि त्यांचे गुण हा विचार इथलाच. जडाहून जीव आणि आत्मा निराळा आहे, हे ज्ञान त्या वेळी होते. आत्मा नश्वर नसून अमर आहे. जड व चेतन याहून तिसरा, या दोघांना उत्पन्न करणारा कोणीतरी आहे - तोच परमात्मा किंवा परमेश्वर. सांख्यमत द्वैती असून, त्यात २४ तत्त्वे सांगितली आहेत. पंचविसावे तत्त्व म्हणजे पुरुष वा आत्मा होय. परमेश्वर लीला म्हणून जगताचा खेळ खेळत आहे. सृष्टी का उत्पन्न झाली, याचा इथे ऊहापोह आहे. सांख्यांच्या प्रकृती-पुरुष-विवेकाप्रमाणे सत्त्व-रज-तम हे त्रिगुण जगताचे कार्य करतात. जिवाचे मुख्य लक्षण प्राण (श्वास-उच्छ्वास). प्राण आहे म्हणजे जीव आहे, आणि जीव आहे म्हणजे तो चालवणारा आत्मा आहे. पंचीकरण आणि आत्म्याचे स्वरूप ग्रंथात दिलेले आहे. पुनर्जन्म आपल्याकडे मानतात. अनेक जन्मांच्या कर्मांनुसार निरनिराळे देह (योनी) प्राप्त होत असतात, हाच कर्मसिद्धांत. ज्ञानप्राप्तीनंतर (आत्मज्ञान) जीवनचक्र बंद होते. प्रत्येकाला कधी ना कधी त्याचा लाभ होणारच! आत्मा आणि स्थूल-सूक्ष्मादि देहांची सविस्तर माहिती या प्रकरणांत मिळते. अवर्णनीय अशा परब्रह्माचे वर्णन करण्याचा प्रयत्नही झालेला आहे. वैराग्य, योगसाधन आणि वेदान्ताचे ज्ञान यातूनच मोक्षप्राप्ती साध्य आहे. संसारात नीतीचे आचरण अत्यावश्यक आहे. धर्म हा लोकांच्या कल्याणाकरिताच सांगितलेला आहे. त्यापासून इहलोकी व परलोकी सुख प्राप्त होते.

प्रकरण सतरावे : भिन्न मतांचा इतिहास (पृष्ठे ७०)
परमेश्वरप्राप्तीसाठी निरनिराळे मार्ग उत्पन्न झाले. त्या सर्वांचे अंतिम उद्दिष्ट ज्ञानप्राप्ती हेच आहे. या प्रकरणात सांख्य, योग आणि वेदान्तमतावर सविस्तर चर्चा केलेली आहे. ती मुळातूनच पाहावी. सांख्यांचा मूळ ग्रंथ महाभारतच - अर्थात भगवद्गीता. योग तत्त्वज्ञान सांख्यांहूनही प्राचीन आहे. उपनिषदांमधून चित्तवृत्तीनिरोध म्हणजे योग सांगितला आहे. त्यापासून शांती, दीर्घायुष्य, आरोग्य आणि अंतिमत: समाधीसुख प्राप्त होते. वेदांताचा विचार याआधी थोडा झाला आहे. उपनिषदांमधील तत्त्वज्ञान म्हणजेच वेदांत. अध्यात्म-साधनेने ब्रह्मप्राप्ती होते, हेच वेदान्ताचे प्रतिपादन आहे. ज्ञानप्राप्ती म्हणजे मोक्ष.

प्रकरण अठरावे : भगवद्गीताविचार (पृष्ठे ७०)
‘उपसंहारा’चे हे अखेरचे प्रकरण. गीता ही केवळ भारतीयांनीच नव्हे, तर साऱ्या जगाने तत्त्वज्ञानाची जननी मानली आहे. हजारो वर्षे सर्वत्र गीतेचा अभ्यास सुरू आहे. त्यात एकूण ७०० श्लोक आहेत. ती महाभारतामध्येच समाविष्ट आहे. रणांगणावर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ती ऐकवली. व्यास हेच श्रीकृष्णाचे तत्त्वज्ञान प्रतिपादित आहेत. हे प्रकरणसुद्धा सविस्तर वाचावे. आपल्या अनेक शंका त्यातून दूर होतील. गीतेच्या अठरा अध्यायांमधून भगवंताने दिव्य उपदेश जगाला प्रदान केला आहे.

ग्रंथाच्या शेवटी ‘महाभारतकालीन भारतवर्ष’ आणि ‘चांद्रवंश (भारतवर्ष)’ हे दोन नकाशे दिले आहेत. अभ्यासकांना ते फारच उपयुक्त ठरतील.

चिं. वि. वैद्यांचा हजार पानी ‘उपसंहार’ हा ग्रंथ सध्याच्या काळात प्रकाशित केल्याबद्दल ‘प्रफुल्लता प्रकाशन’ अभिनंदनास पात्र आहे. मराठी सारस्वतांवर हे फार मोठे उपकार झाले आहेत. हा ग्रंथ संग्रही ठेवून संपूर्ण वाचावा. निदान वाचनालयातून आणून तरी अवश्य वाचावा. 

(या लेखाचा पूर्वार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)


(‘उपसंहार’ हा ग्रंथ ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZPBBX
Similar Posts
महाभारताचा उपसंहार (पूर्वार्ध) पुण्यातील ‘चिपळूणकर आणि मंडळी’ या प्रकाशन संस्थेने ‘श्रीमन्महाभारताचे मराठी सुरस भाषांतर’ नऊ भागांत प्रसिद्ध केले. त्याचा सर्वांगीण परामर्श घेणारा विवेचक उपसंहार सिद्ध करण्याचे संशोधनपर काम रा. ब. चिंतामणराव विनायक वैद्य यांनी स्वीकारले आणि चार वर्षांत समर्थपणे पार पाडले. ‘उपसंहार’ या हजार पानी ग्रंथाची पहिली आवृत्ती सन १९१८मध्ये प्रसिद्ध झाली
पुण्यातील जुनी चित्रपटगृहे नुसत्या आठवणींनी गतकाळात नेणाऱ्या पुण्यातील जुन्या चित्रपटगृहांबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
संक्षिप्त भगवद्गीता (उत्तरार्ध) आज गीता जयंती आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेली श्रीमद्भगवद्गीता म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा. ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांनी भगवद्गीतेच्या १८ अध्यायांचे सार लिहिले असून, त्याचा पूर्वार्ध आपण याआधी पाहिला. त्याचा उत्तरार्ध आता पाहू या...
बहुजन हिताय बहुजन सुखाय - आकाशवाणी १३ फेब्रुवारी हा जागतिक रेडिओ दिन. त्या निमित्ताने, ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर ‘किमया’ सदरात आज लिहीत आहेत ‘आकाशवाणी’बद्दल...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language